अलिबाग – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे व त्यांचे सुपुत्र आमदार अवधूत तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्रीची वारी केली. रायगडचे राजकारण यानिमित्ताने पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दोघेही बापलेक दसरा मेळाव्यात हातावरचे घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार का ? यापेक्षा मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडतील का ? याची चर्चा सुरू झाली आहे. मागील अनुभव लक्षात घेता आता शिवसेना गळयात धोंड बांधून घेते की पायावर धोंडा मारून घेते एवढाच प्रश्न उरला आहे. त्यातच स्थानिक शिवसैनिकांनी तटकरे पिता-पुत्रांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध केला आहे.
तटकरे कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आल्यानंतर हा वाद आता मिटण्याच्या पलीकडे गेला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील दोन्ही कुटुंबामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही हे बापलेकांच्या मातोश्रीवारीने हे पुन्हा स्पष्ट झालं आहे. खरं आज या कौटुंबिक वादावर चर्चा करण्यात काहीच हशील नाही . त्याचा संबंध रायगडच्या राजकारणाशी येतो एवढाच. पितापुत्रांच्या बाबतीत शिवसेना काय भूमिका घेते याकडं जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मागील नगरपालिका निवडणूकीपासून नाराज अनिल आणि अवधूत तटकरे यांची शिवसेनेशी सलगी सुरू झाली. उदधव ठाकरे यांच्या रोहा दौ-यात धावीर महाराजाच्या दर्शनाला अवधूत व उदधव ठाकरे सोबत होते. पुढे अनिल तटकरे यांचे धाकटे चिरंजीव संदीप शिवसेनेत आले. त्यांनी शिवसेनेकडून रोहा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवल. रोहयातील वातावरण आपल्या विरोधात आहे. त्यामुळे आपला तग लागणार कसा या विवंचनेत सुनील तटकरे होते. परंतु हार मानतील ते सुनील तटकरे कसले ? त्यांनी खेळी करून आपल्या सेनेतील हस्तकांकरवी घाईघाईने संदीप तटकरे याला शिवसेना प्रवेश करवून घेतला आणि रोहा नगरपालिका ताब्यात ठेवण्याचा डाव यशस्वी केला अशी चर्चा जिल्हयात आहे. शिवसेना मात्र तटकरे यांचे घर फोडले या आनंदात नेहमीप्रमाणे मशगुल राहिली. जिल्हा परीषद निवडणूकीच्या वेळी सुनील तटकरे यांचे डाव शिवसेनेच्या लक्षात आले तोपर्यंत खूपच उशीर झाला होता . शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या पत्नीने आयत्यावेळी आदिती तटकरे यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली आणि शिवसेनेला तोंडघशी पाडले .
मधल्या काळात तटकरे कुटुंबात सारं काही आलबेल आहे असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. परंतु तशी वस्तुस्थिती नव्हती. शरद पवारांच्या मध्यस्तीनंतरदेखील तटकरे कुटुंबातील धुसफूस सुरूच होती. अनिल तटकरे अधूनमधून राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसायचे पण पुढे ते ही कमी झाले. अवधूत मात्र पक्षाच्या कार्यक्रमात कुठेही दिसत नव्हते. एकेकाळी अवधूत यांची परवानगी घेतल्या शिवाय रोहयात राष्ट्रवादीचा बॅनर लागत नव्हता तिथे राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अवधूतच गायब झाले . सुनील तटकरे यांनी हे पदधतशीरपणे घडवून आणलं इथं त्यांचया राजकीय मुत्सददेगिरीची चुणूक पहायला मिळाली. कुटुंबात धुमसत असताना ते यावर कुठेही भाष्य करत नव्हते उलट यामुळे आपण व्यथित झालो आहोत असे सांगत लोकांची आणि पक्षाची सहानुभूती मिळवण्यात ते यशस्वी झाले. ठंडा करके खाओ , ही त्यांची कॉंग्रेसी नीती अपेक्षेपेक्षा भलतीच फळास आली .
आता राहता राहिला प्रश्न अवधूत आणि अनिल तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाचा याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे त्यांच्या पातळीवर घेतीलच. यदा कदाचित हे तटकरे बापलेक शिवसेनेत आले तर शिवसेनेचा कितपत फायदा होईल, मुळात फायदा होईल की तोटा ….. हा खरा सवाल आहे. सध्या याचीच चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर गेल्या 4 वर्षात अवधूत तटकरे यांनी आमदार म्हणून मतदार संघाकडे ढुंकूनही बघितलं नाही. जनतेशी मतदारांशी संपर्कच ठेवला नाही. त्यांच्या कारकीर्दीत काय कामं झाली ही शोधावीच लागतील. दुसरीकडे पक्षातील कोणीही अवधूत किंवा अनिल भाऊंसोबत जाणार नाही याची सुनील तटकरे यांनी खात्री करून घेतली. अलीकडे झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये याची पावती मिळाल्यानंतरच सुनील तटकरे यांनी कासरा ढिला केलेला दिसतो आहे .
तटकरे कुटुंबाने आपली म्हणजे पक्षाची फसवणूक केल्याची भावना इथल्या शिवसैनिकांमध्ये आह. त्यामुळे नेत्यांनी स्वीकारलं तरी शिवसैनिक त्यांना स्वीकारतील की नाही याबददल शंकाच आहे. बरं पक्षात आले तर त्यांना देणार काय हा देखील प्रश्न आहे . आधीच श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेत इच्दुकांची भाउगर्दी आहे. राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी शिवसेनेत अनेक जण इच्छुक आहेत. गेल्या निवडणूकीत अवघ्या 70 मतांनी झालेला पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. आणि तो पराभव अवधूत तटकरे यांनी केलाय. त्यामुळे अवधूत तटकरे यांची मातोश्रीवारी फळास येईल असे दिसत नाही. तटकरे बापलेकांच्या मातोश्रीवारीची बातमी येवून धडकल्यानंतर येथील शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. जर दोघांना शिवसेनेचे दरवाजे खुले झाले तर रायगडमधील शिवसेनेत धुसफूस वाढणार हे निश्चित आहे. शिवाय सध्या कुठल्याही पक्षात नसलेले आणि असलेले जे सुनील तटकरे यांचे विरोधक आहेत त्यांची सहानुभुती शिवसेनेला आहे ती देखील मिळणार नाही. तटकरेंच्या भावाला पक्षात आणले , तटकरेंच कुटुंब फोडलं हा मेसेज राज्यात देण्यासाठी उदधव ठाकरे कदाचित तसे करतीलही परंतु जिल्ह्यात पक्षाला फायद्यापेक्षा तोटाच होऊ शकतो असे चित्रं आहे.
शिवसैनिकांचा विरोध लक्षात घेऊन मातोश्रीचे दरवाजे बंद झाले तर तटकरे पितापुत्रांना भाजपमध्ये सहज प्रवेश मिळू शकतो . शिवसेना सध्या तरी युती करण्याच्या मनस्थितीत नाही . त्यामुळे अवधूत यांच्या रूपाने भाजपला श्रीवर्धनमध्ये त्यातल्या त्यात ताकदीचा उमेदवार मिळू शकतो. पुढं काय होतं त्याकडं जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS