उस्मानाबाद – परंडा तालक्यातील सिना कोळेगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने ऊसाचा गोडवा कडवट होत असल्याचं दिसून येत आहे. परंडा तालुक्यातील भैरवनाथ कारखान्याच्या गाळपावरून शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यात चांगलेच युद्ध रंगू लागले आहे. भैरवनाथ कारखान्याला परजिल्ह्यातून ऊस येत असल्याच्या कारणावरून आमदार पाटील यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिल्याने वातावरणात गरमागरमी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उपनेते सावंत यांना कारखाना उभारणीसाठी माजी आमदार पाटील यांनीच मदत केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या या दोन नेत्यात आडवा विस्तव जात नाही.
दरम्यान सावंत यांची उपनेतेपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पंरडयात होणार होते. परंतु, उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर पाटील यांचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला होता. आता पुन्हा एकदा माजी आमदार पाटील यांनी शिवसेना उपनेते प्रा. सावंत यांना थेट इशारा दिला आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करणार नसाल तर आंदोलन करण्याची धमकीच पाटील यांनी सावंतांना दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन नातेवाईकातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत. अतिरीक्त होत चाललेल्या ऊसाने दोन नेत्यात चांगलाच संघर्ष सुरू झाल्याने विरोधी गटात चांगले फटाके फुटत आहेत. येत्या प्रजासत्ताकदिनी याबाबत काय घडामोडी होतात, याकडे परिसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS