रत्नागिरी – राज्यामध्ये आज पार पडलेल्या विविध ठिकाणच्या शिवसेना आणि भाजपच्या मेळाव्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असंच काहीसं चित्र पहावयास मिळालं आहे. कारण जळगावमध्ये पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात गिरीष महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तर रत्नागिरीमधील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेनंही भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजप आता आमचा एक नंबरचा शत्रू असून भाजपला हद्दपार करण्यासाठी कोकणातील आम्ही सर्व नेते एकत्र आलो असल्याचा निर्धार कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. निर्धार मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप आणि नारायण राणेंविरोधात जोरदार टीका केली आहे. तसेच नाणार प्रकल्पाला आमचा कायम विरोध असल्याचंही म्हटलं आहे.
दरम्यान जळगावमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजप स्वबळावर सत्तेत येणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूकीत दोन जागा विरोधकांनी मिळवल्या तेवढ्यात विरोधकांची गत ‘उंदरांना चिंधीचा आधार’ अशी झाली असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्याच सुरात सुर मिळवून शिवसेना देखील आम्हाला डरकाळी दाखवत आहे, परंतु आम्हाला आगामी निवडणुकीत युतीची गरज भासणार नाही, आम्ही राज्यात स्वबळावर सत्ता करु असा दावा गिरीष महाजन यांनी यावेळी केला आहे. शिवसेना आणि भाजपनं केलेल्या एकला चलोच्या ना-यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं असून आगामी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS