मुंबई – विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतु आता मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षामध्ये रस्सीखेच सुरु झाली असल्याचं दिसत आहे. आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाला ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजपही आपल्या भूमिकेवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी मान्य करणार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे यावर आता काय तोडगा निघणार हे पाहण गरजेचं आहे.
दरम्यान या निवडणुकीत भाजपला अवघ्या १०५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी ५६ जागा मिळालेल्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 50-50 फॉर्म्युला सांगून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरही दावा केला आहे. परंतु यावर तोडगा निघाला आणि मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेचा जर उपमुख्यमंत्री झाला, तर भाजपकडूनही आणखी उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होतील आणि भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या आगामी भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहो.
COMMENTS