मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना अपयश, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना उमेदवारी !

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना अपयश, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगांना उमेदवारी !

पालघर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलं असून पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पूत्र आहेत. चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत वनगा कुटुंबियांनी 3 मे रोजी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतरही वनगा कुटुंबिय निर्णय बदलतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला होता. परंतु आज अखेर वनगा कुटुंबियांनी शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला असून श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

दरम्यान आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली होती. मात्र ती देण्यात न आल्याची खंत वनगा यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती. तसेच पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. त्यानंतर श्रीनिवास वनगा यांना अखेर शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

COMMENTS