उस्मानाबाद – जिल्ह्यात यंदाच्या वर्षात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शिल्लक ऊसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावण्याची भिती आहे. त्यात जास्तीची गाळप क्षमता असलेला तेरणा साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. शिवाय तुळजाभवानी साखर कारखान्याची धुराडीही बंदच आहे. गेल्या सहा-सात वर्षात जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. अतिरिक्त उसाचा प्रश्नावरुन शेतक-यांची नाराजी निवडणुत परवडणारी नाही. हे ओळखून त्यात्या भागातील नेत्यांनी त्यांचे बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.
परंडा विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल मोटे यांच्याकडे एकही साखऱ कारखाना नाही. त्यांचे प्रतिस्पर्धी तथा शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे पंरडा मतदारसंघात दोन साखर कारखाने आहेत. त्यामुळे सहाजीकच त्यांचा संपर्क मतदारसंघातून वाढला आहे. मात्र उभारणीनंतर कायमच बंद असलेला बाणगंगा साखर कारखाना राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत होती. कारखाना आणि ऊसाच्या माध्यमातून अनेक गावातील कार्यकर्ते आमदार प्रा. सावंत यांच्याकडे वळले आहेत. त्यामुळे आमदार मोटे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. कारखाना सुरू करण्यासाठी मदत करा, अन्यथा मला मतदारसंघातून तिकीटच नको, असा इशारा दिल्याने चक्रे वेगाने हालली. प्रथम स्थानिक स्तरावर कारखाना चालविण्यासाठी कोणी तयार होते का त्याची चाचपणी सुरू झाली होती. मात्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याने कारखाना चालविण्यासाठी तयार झाल्याने आता बाणगंगा सुरू होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
दुसरीकडे तीन-चार वर्षांपासून बंद असलेला नरसिंह साखर कारखाना सध्या शिवसेनेचे नेते शंकरराव बोरकर यांच्या ताब्यात आहे. त्यांनीही कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील असे कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उस्मानाबाद तालुक्यात भाजपचे अॅड. गुंड यांनीही एक हजार २०० टनाचा खांडसरी प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. उस्मानाबाद तालुक्यात तुळजाई साखर कारखाना गेल्या पाच वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. सध्या त्याच्या उभारणीलाही वेग आल्याची चर्चा आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उभारणी सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. तर माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरही बोरवंटी (ता. कळंब) येथील कारखाना सुरू करण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या कारखान्यासाठीही पश्चित महाराष्ट्रातील एक बडा नेता कारखान्यावर येऊन गेल्याची चर्चा आहे. येत्या ऊस गळीत हंगामात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला तर त्यांचा रोष आपल्यावर वाढू शकतो. त्यामुळे हा रोष आपल्यावर येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील या नेत्यांनी आता साखर
कारखाने सुरू करून शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी पळापळ सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे साखर कारखान्यांचे धुराडे आगामी काळात नेत्यांना उब देणार का…..
COMMENTS