शामसुंदर सोन्नर यांच्या ‘उजळावया आलो वाटा’चे शरद पवारांच्या हस्ते रविवारी पुण्यात प्रकाशन !

शामसुंदर सोन्नर यांच्या ‘उजळावया आलो वाटा’चे शरद पवारांच्या हस्ते रविवारी पुण्यात प्रकाशन !

मुंबई –  प्रसिद्ध कीर्तनकार, संवेदनशील कवी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या कीर्तन मालिकेतील एका पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी पुणे येथे देशाचे माजी कृषी मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज आणि तुकाराम महाराज यांचे वंशज आणि देहूकर फडाचे प्रमुख बापुसाहेब देहुकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रकाशक तथा राष्ट्र सेवादल मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुण्यात आहे.  त्याचे औचित्य साधून एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ पत्रकार भवन शेजारी, पुणे येथे सायंकाळी 4.30 वाजता या कीर्तन मालिकेचे प्रकाशन होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्र सेवादलाचे विश्वस्त आणि माजी न्यायमूर्ती प्रकाश परांजपे, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे सचिव सुभाष वारे, अविनाश पाटील, राष्ट्र सेवादल मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, पुण्याचे कार्याध्यक्ष भगवान कोकणे, संघटक प्रकाश कदम, मुंबईचे संघटक चंद्रकांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राला वारकरी संतांच्या सुधारणावादी विचारांची प्रगल्भ अशी परंपरा आहे. ज्यावेळी प्रबोधनाची साधने विकसित झालेली नव्हती तेव्हा संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात प्रबोधन केले. वारकरी संतांचा सामाजिक समता, विश्वबंधूत्व आणि विवेकी विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम ह.भ.प. शामसुंदर महाराज कीर्तनातून करीत आहेत. व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, स्त्री सक्षमीकरण या विषयावर ते कीर्तनातून प्रबोधन करतात. कीर्तन हे केवळ मंदिरातील उपचार न रहाता ते प्रबोधनाचे साधन ठरावे म्हणून ते वेगवेळे प्रयोग करीत असतात. एखादा गुन्हा करून तुरुंगात गेलेल्या कैदयांसाठी आॅर्थररोड कारागृहात ‘आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा॥’ या अभंगावर त्यांनी कीर्तन केले होते. तर दुष्काळग्रस्त  भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तेव्हा ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पिडा केली॥’ या तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करून त्यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले होते. या सर्व विषयांवर ते संतांच्या वचनाच्या आधारावर प्रबोधन करीत असतात. शामसुंदर महाराज यांच्या वाणीतील संतांचा हा विचार गावागावात पोहचावा, हा विचार इतर कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून मांडावा, याच विचाराचे नव्या दमाचे कीर्तनकार तयार व्हावेत यासाठी मुंबई राष्ट्र सेवादलाच्या वतीने ‘उजळावया आलो वाटा’ ही कीर्तनमालिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे, असे आवाहन राष्ट्र सेवा दल मुंबईचे कार्याध्यक्ष आणि या कीर्तन मालिकेचे प्रकाशक शरद कदम यांनी केले आहे.

COMMENTS