नवी दिल्ली – देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि युपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा रंगत असताना सोमवारी सायंकाळी सीपीएमचे नेते सिताराम येच्युरी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. या भेटीत कृषी विधेयकाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाचे विरोधी पक्षांचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, असे पवारांना साकडे घातल्याची सूत्रांनी माहिती दिली.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शऱद पवार, राहुल गांधी, डी राजा, सिताराम येच्युरी आदींनी राष्ट्रपतींना निवेदन देऊन हे तिन्ही कायदे मागे घेऊन त्यावर चर्चा करावी, अशी मागणी केली होती.
तसेच शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदी सरकारवर टिका केली. हे कायदा सरकारने कोणत्याही चर्चेविना मंजूर केले आहे. या कायद्यावर सर्व पक्षांच्या लोकांशी चर्चा करून पंतप्रधानांना निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला होता. दरम्यान, शरद पवार यांची सीपीएम नेते सिताराम येच्युरींनी भेट घेतली. यावेळी दोंन्ही नेत्यांमध्ये पश्चिम बंगाल निवडणुक आणि कृषी विधेयकाच्या आंदोलनाची चर्चा झाली असल्याचे समजत आहे.
COMMENTS