मुंबई – लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून निवडून आलेले भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यानंतर आता आणखी एक महाराज राजकारणात येण्यास उत्सुक आहेत. श्रीकंठ शिवाचार्य हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेसकडे त्यांनी अर्जही केला आहे. श्रीकंठ शिवाचार्य हे खासदार जयसिदेश्वर शिवाचार्यांचे विश्वासू आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ते
जयसिदेश्वर शिवाचार्य यांच्यासोबत कायम होते. ते त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी ओळखले जातात. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांच्यापाठोपाठ तेही राजकारणात येऊ पाहत आहेत.
दरम्यान श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील मठाचे मठाधिपती आहेत. अक्कलकोट येथील विद्यमान काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यात फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीही मागितली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा श्रीकंठ शिवाचार्य यांना आहे.
COMMENTS