सोलापुरात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसच्या ‘या’ दोन आमदारांची मुलाखतीला दांडी!

सोलापुरात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसच्या ‘या’ दोन आमदारांची मुलाखतीला दांडी!

सोलापूर – आगामी निवडणुकीसाठी सोलापुरात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. आमदार शरद रणपिसे यांच्या उपस्थितीत सोलापुरात विधानसभेसाठी इच्छुकांची मुलाखती सुरू आहेत. परंतु या मुलाखतीला विद्यमान आमदारांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे दोघेही या मुलाखतीला अनुपस्थितीत राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ सोलापुरात काँग्रेसलाही जबर धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून आमदार भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे हे दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याचा संशय बळावत आहे. काँग्रोसच्या या दोन आमदारांबरोबरच बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे हे दोघेही मुलाखतींना अनुपस्थित राहिले होते. आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या तर बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे सोलापुरातील या चार आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर याठिकाणी आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS