मुंबई – थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील नेत्यांसह देशातीलही काही नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी शक्यता होती. परंतु सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी स्वत: एका पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.
दरम्यान काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज सकाळी झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपनं महाराष्ट्रातील लोकशाही नष्ट करण्याचे केलेले प्रयत्न लज्जास्पद होते, असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम केलं. भाजपचं हे कृत्य लज्जास्पद आहे. महाविकास आघाडी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असंही त्या म्हणाल्या.
COMMENTS