मुंबई – वाढणाऱ्या इंधनाच्या (डिझेल) दरामुळे एसटीसमोर ‘अपरिहार्य’ तिकिट दरवाढीचे संकट उभे राहिले असून लवकरच एसटी प्रशासन तिकीट दरवाढ करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती एसटी महामंडळामार्फत देण्यात आली आहे. मागील वर्षी मे 2017 मध्ये एसटीला मिळणाऱ्या डिझेलचा दर हा सरासरी रु.58.02/- इतका होता. तो यंदाच्या मे महिन्यात सरासरी रु.68.39/- इतका झाला आहे. त्यामुळे प्रति लीटर रु.10.38/- इतके जादा पैसे एसटीला मोजावे लागत आहेत. वाढत्या डिझेल किंमतीमुळे दिवसेंदिवस इंधन खर्चात वाढ होत असून तब्बल 2 हजार 300 कोटी रु.संचित तोटा सोसणाऱ्या एसटीला यावर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
याचबरोबर इतकाच भार एसटीतील सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पगारवाढीमुळे भविष्यात सहन करावा लागणार आहे. तसेच महामार्गावरील टोल दरवाढीचा अतिरिक्त भार एसटीवर पडत आहे.
गेली सहा महिने सातत्याने डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असून देखील केवळ ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकीट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एसटीने आतापर्यंत तिकीट दरवाढ करण्याचे टाळले आहे. यापूर्वी जुलै – ऑगस्ट 2014 मध्ये एसटीची तिकीट भाडेवाढ झाली होती. आता मात्र सातत्याने होणाऱ्या डिझेल दरवाढ कुठे थांबेल हे निश्चित नसल्याने एसटीला नाईलाजास्तव तिकीट भाडेवाढ करणे अपरिहार्य बनले आहे. वरील सर्व घटकांचा विचार करुन एसटी प्रशासन लवकरच आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार तिकीट भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
COMMENTS