पुणे – श्रीक्षेत्र पंढरपूर येथे, २३ जुलै (सोमवार) रोजी भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एस. टी महामंडळातर्फे राज्याच्या विविध भागातून ३७८१ बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनंतर परतीच्या प्रवासांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबाल वृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसेसपैकी १० टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पुणे येथे आषाढी यात्रेच्या नियोजना संधर्भात मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंह देओल यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकारी व सर्व जिल्ह्याचे विभाग नियंत्रक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
प्रवाश्यांच्या सोयीसाठी ३ तात्पुरती बसस्थानके
आषाढी यात्रेला राज्यभरातून विशेषतः मराठवाडा , खान्देश , पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना सुरक्षितरित्या प्रवास घडवून आणण्यासाठी २१ जुलै ते २८ जुलै या यात्रा काळामध्ये एस. टी चे सुमारे ८ हजार कर्मचारी अहोरात्र सेवा देणार आहेत . प्रवासांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे ३ तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. मराठवाड्यांच्या प्रवाशांसाठी भीमा बसस्थानक, पुणे-मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी चंद्रभागनगर बसस्थानक व जळगाव-नाशिक येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पंढरपूर जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानक उभारण्यात येत आहे.
रिंगण सोहळ्यासाठी जादा बसेसची सोय
२१ जुलै (शनिवार) रोजी बाजीराव विहिर येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्याला भाविक-प्रवाशांना जाण्यासाठी एस. टी ने पंढरपूरहून १०० जादा बसेसची सोय केली आहे. सदर बसेस दिवसभर या मार्गावर प्रवाशांची ने-आण करतील. तसेच पंढरपूरहून ७ कि. मी. अंतरावर असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे बसस्थानकावर जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांसाठी सोयी-सुविधा
वरील तिन्ही बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, विद्युत सेवा, फिरती स्वच्छतागृह, उपहारगृह, रुग्णवाहिका, प्रत्येक विभाग निहाय चौकशी कक्ष संगणकीय उद्घोषणा इ . सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच तिन्ही बसस्थानकावरील यात्रा काळातील हालचाली टिपण्यासाठी सी.सी.टी. व्ही कॅमेरे लावण्यात येत आहे.
परतीच्या प्रवासाकरिता १०% बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध
यात्रेनंतर परतीच्या प्रवासांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबाल वृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून जादा बसेस पैकी सुमारे १०% बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रेच्यावेळी स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांना गर्दीमुळे बसेसमध्ये चढताही येत नाही . किंबहुना त्यांना शेवटची आसने मिळतात. अशावेळी त्यांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांचे आसन निश्चित होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होतो. यासाठी त्यांच्यासह सर्व प्रवाशांनी एस. टी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षण करावे. त्याचबरोबर msrtc reservation mobile app चा वापर करावा. तसेच यावर्षी अभिनव प्रायोग म्हणून पंढरपूर येथील ज्या ठिकाणी वारकऱ्यांचा निवास असतो (मठ, यात्री=निवास, धर्मशाळा) अशा ठिकाणी एस. टी चे कर्मचारी स्वतः जाऊन प्रवाशांच्या मागणीनुसार आगाऊ आरक्षण करून देणार आहेत. या सुविधेचा लाभ भाविक-प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एस. टी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.
COMMENTS