मुंबई – राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबर 2017 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2017 असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी 3 पर्यंत असेल. 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 31, पालघर- 39, रायगड- 11, रत्नागिरी- 10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 2, जळगाव- 100, नंदुरबार- 13, अहमदनगर- 67, पुणे- 99, सोलापूर- 64, सातारा- 19, सांगली- 5, कोल्हापूर- 12, औरंगाबाद- 2, बीड- 162, नांदेड- 4, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर- 5, अमरावती- 13, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 43, वर्धा- 3, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 734.
COMMENTS