मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ मंत्र्यांना मिळणार डच्चू तर मंत्रिपदावर यांची वर्णी लागणार ?

मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ मंत्र्यांना मिळणार डच्चू तर मंत्रिपदावर यांची वर्णी लागणार ?

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी देणार आणि कोणाला डच्चू मिळणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मंत्रिमंडळाच्या फेरबदलात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, विद्या ठाकूर यांना डच्चू दिला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या मंत्रिमंडळात विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या जागी मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांना संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे. तर राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याऐवजी अमरावती जिल्ह्यातील डॉ.अनिल बोंडे यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती आहे. तर विद्या ठाकूर यांना वगळून योगेश सागर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु आशिष शेलार हे एका वर्षासाठी मंत्रीपद घेण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.

तसेच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनाही डच्चू दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना परत मंत्री केले जाईल का या बाबत तर्कवितर्क लढविले जात असून मंत्रिमंडळात खडेसंना घेण्यासाठी भाजपा श्रेष्ठींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नसल्याची माहिती आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी दिली जाणार आणि कोणाला डच्चू मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS