मुंबई – राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्य घटनेतील 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सोमवारी दुपारी 2 वाजता एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट येथील पाटकर सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडणार असून राजकीय पक्षांची भूमिका, मतदारांच्या अपेक्षा, निवडणूक सुधारणा आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. आयोगाचे सचिव शेखर चन्ने, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुहास पळशीकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, श्री. भीम रासकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. मृदुल निळे, डॉ. सुनंदा तिडके, डॉ. ए. एन. सिद्धेवाड, श्रीमती अनुया कुवर, श्रीमती मानसी फडके आदी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण आणि त्यांच्या निवडणुका वेळेवर घेण्याच्या दृष्टीने झालेली 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती ऐतिहासिक ठरली आहे. निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 2004 पासून राजकीय पक्षांच्या नोंदणीस सुरुवात केली असून सध्या 251 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
COMMENTS