मुंबई – एकटी कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला असून पगारवाढ व इतर मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे हे आंदोलन पुकारलं असल्याचं एसटी कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. पगारवाढीची घोषणा करण्यात आली मात्र ही फसवी असून कर्मचा-यांना योग्य न्याय देण्यात येत नाही त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचं या संघटनेनं म्हटलं आहे. दरम्यान एसटी कर्मचा-यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे राज्यातील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वाहतूकसेवा ठप्प झाली असल्याचं पहावयास मिळत आहे.
पालघर
पालघरमधील एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे पालघर डेपोतील लांब पल्ल्याच्या 22 आणि लोकल भागातील एकूण 650 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
अकोला
अकोल्यातही बंदला प्रतिसाद मिळाला असून 14 संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. दिवाकर रावते यांनी वेतनवाढीच्या नावाने फसवणूक केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. मूर्तिजापूर , मंगरुळपीर डेपो 100 % बंद आहे.
सातारा
सातारा जिल्ह्यात एसटी कामगार संघटनेने आज सकाळपासून बंद पुकारला असुन सातारा , कराड ,वाई, फलटण , कोरेगाव या सर्व आगारात एस टी बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सातारा जिल्ह्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असुन सर्व आगारात शुकशुकाट दिसत आहे.
वसई
वसईतही एसटी कर्मचा-यांचा संपाला पाठिंबा मिळाला आहे. मात्र याठिकाणी महापालीकेची परिवहन सेवा असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याचं दिसत आहे.
धुळे
धुळे जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचं पहावयास मिळत आहे.
नंदुरबार
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांनाही बसला असून चार डेपोची बस वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. दूरच्या ठिकाणाहून आलेलं प्रवासी नंदुरबार बस स्थानकात थांबले असून याठिकाणी आरटीओने खाजगी वाहनांची सोय केली आहे.
बीड
एसटी कामगारांच्या संपाला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बीड जिल्ह्यात काही भागातून एसटी बसची वाहतूक सुरू असून प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
नाशिक
मनमाड,येवला,मालेगाव आगरातुन सध्या बस सुरु असून य़ाठिकाणी संपाचा फारसा परिणाम दिसला नाही, सटाणा आगरात मात्र बस बंद आहेत.
जालना
जालना, अंबड, परतूर या आगारातून बस सुरु असून जाफ्राबाद आगारातून बस बंद झाल्या आहेत. जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फारसा परीणाम नाही.
पुणे
स्वारगेट बसस्थानकात सकाळी ७ पर्यंत गाड्या सुटल्या होत्या परंतु त्यानंतर बंद झाल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून बाहेरील डेपोच्या गाड्या जाताहेत परंतु स्थानिक बस बंद आहेत.
COMMENTS