नवी मुंबई – पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ताधारी भाजपाच्या दबावाला बळी पडले असल्याचं बोललं जात आहे. तसेच इतरही काही आयएएस अधिका-यांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपा नगरसेवक आणि स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुधाकर शिंदे यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यामुळे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजप नगरसेवक आणि आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पटेनासं झालं होतं. आयुक्त कोणत्याच प्रकारची नागरी कामं करत नसल्याचा आक्षेप सत्ताधारी भाजपाने घेतला होता. कचरा प्रश्न, पाणी, सार्वजनिक भूखंड, मैदानं या महत्वाच्या कामात आयुक्तांना अपयश आल्याचं कारण देत भाजपाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. भाजपाच्या 50 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने तर शेकाप आघाडीच्या 22 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं होतं.
COMMENTS