मुंबई – लोकसभा निवडणुकूचा निकाल लागण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच एका लग्नपत्रिकेत सुजय विखे यांच्या नावापुढे खासदार असं लावण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यात येत्या 8 मे रोजी हा विवाह होणार आहे. या लग्नपत्रिकेत सुजय विखे यांचं नाव छापण्यात आलं आहे. मात्र त्यांचा उल्लेख ‘संसद सदस्य भारत सरकार’ असा करण्यात आला आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर वायरल झाली आहे.
दरम्यान विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना मैदानात उतरवून सुजय यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा या मतदारसंघातील निकालाकडे लागल्या आहेत. येत्या 23 तारखेला निकाल लागणार आहे परंतु त्यापूर्वीच विखेंचेया समर्थकांनी मात्र सुजय विखेंचा उल्लेख खासदार असा केला आहे.
COMMENTS