मराठा आरक्षण सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मराठा आरक्षण सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबईः मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरु होणार होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला होता. एसईबीसी (सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याच्या निर्णय घेण्यात आला होता.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयात यापूर्वी ९ डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. तसेच, २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणावर अखेरची सुनावणी सुरु केली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावरील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं जाहीर केलं होत. मात्र, सर्व पक्षकारांच्या विनंतीनंतर आज न्यायालयानं सुनावणीला स्थगिती देत ५ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.

मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑनलाइन न घेता प्रत्यक्षरित्या घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाकडे केली होती. राज्य सरकारच्या विनंतीनुसार न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सुनावणी प्रत्यक्षरित्या करता येईल का नाही किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल याबाबत दोन आठवड्यांत निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट या न्यायमूर्तींचा या घटनापीठात समावेश आहे.

COMMENTS