नाशिक – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचे अधिकार आहेत. दबावतंत्र वैगरे अशा गोष्टी आमच्या तत्वात बसत नाहीत. त्यामुळे कुणी पक्ष सोडून जात असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरु आहे. अशा कठीण काळात आपली माणसं सोडून जात आहेत हे वाईट वाटत आहे. कारण मोठ्या मेहनतीने ही संघटना उभी राहिली आहे. आम्ही फक्त पक्ष म्हणून काम नाही करत, तर एक कुटुंब म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहोत. तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही. पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येकाने माझ्या वडिलांच्या आयुष्यात त्यांना साथ दिली असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS