मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज एलजीबीटी सेलची स्थापना करण्यात आली आहे. या एलजीबीटी सेलच्या पहिल्या प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रिया पाटील यांची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा देशातला पहिला पक्ष आहे ज्यांनी युवती सेलची स्थापना केली होती. आज समलैंगिक विभाग स्थापन करणारी राष्ट्रवादी पहिली पार्टी आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत म्हणून या सेलची स्थापन केली आहे. आम्ही या माध्यमातून समलैंगिक समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय मुंडे यांनी समलैंगिक समूहाच्या प्रश्नासाठी वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. कोविडमुळे काही गोष्टी थांबल्या मात्र आम्ही ते पुढे करणार असंही सुळे यांनी म्हटलं आहे..
तसेच या सेलच्या अध्यक्ष प्रिया पाटील यांनी समलैंगिक समूह महाराष्ट्रात १०-१२ % आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहे. या प्रश्नांची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जात नाही मात्र राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही ते करू असं आश्वासन दिलं आहे. समानता, रोजगार इतर प्रश्न आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणू असही त्या म्हणाल्या.
दरम्यान जयंत पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. हा समूह असा आहे की तो आजही शिक्षण, आरोग्य या सर्व गोष्टीपासून वंचित आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहु असे आम्ही जाहीरनाम्यात सांगितले होते. मला आनंद वाटतोय की आम्ही दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. या सेलच्या माध्यमातून आम्ही समूहाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासाठी प्रयत्न केले, प्रिया पाटील यांनी पक्षासाठी वेळ दिला त्याबाबत त्यांचे कौतुक. समुहाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही कार्यक्रम आखला आहे. येत्या काळात हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू. सेलला माझ्या शुभेच्छा असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS