सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून नवा उमेदवार, आमदारांच्या सौभाग्यवतींची लोकसभेसाठी तयारी ?

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपकडून नवा उमेदवार, आमदारांच्या सौभाग्यवतींची लोकसभेसाठी तयारी ?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अनेक उलटफेर झाले आणि आघाडीच्या अनेक दिग्गजंना पराभवाचा सामना करावा लागला. बारातमतीची जागा सुप्रिया सुळे यांनी राखली खरी, पण ती कशीबशी. पवारांच्या घरातला उमेदवार नेहमीच तीन चार लाख मतांपेक्षा जास्त आघाडी घेऊन निवडूण यायचा. सुप्रिया सुळे मात्र केवळ बारामतीच्या भरोशावर सुमारे 80 हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या. राष्ट्रवादीसाठी आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी तो धक्काच होता.

सुप्रिया सुळे यांच्यासमोर गेल्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उभे होते. राज्यतभरात त्यांचं नाव असलं तरी तुलनेत मतदारसंघासाठी ते नवखेच होते. निवडणुक चिन्हही त्यांनी भाजपच कमळ न घेता कपबशी या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. तरीही मतदारांनी त्यांच्या पदरात भरभरुन दान दिलं. मग तो दौंड मतदारसंघ असो किंवा, खडकवासला सारखा शहरी मतदारसंघ असो. या मतदारसंघानी जानकर यांना मोठी आघाडी दिली. मात्र निवडणुकीनंतर जानकर मंत्री झाले. पण त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी आहे. त्यामुळेच भाजप आता तिथला उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.

तीच ती नावे पुढे करण्यापेक्षा एखादा नवा चेहरा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात देण्याचा भाजपचा विचार असल्याची चर्चा आहे. त्यातूनच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची बारामती लोकसभेसाठी चर्चा सुरु झालेली आहे. तरुण, सुशिक्षीत, राजकारणातील कोरी पाटील असलेल्या कांचंन यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. नातेगोती, दौंडमध्ये पती आमदार या गोष्टी त्यांच्यासाठी फायद्याच्या आहेत. राहुल कुल यांचे जिल्ह्यातील पवार विरोधकांशी असलेले चांगले संबंध याचाही फायदा कांचन कुल यांना होण्याची शक्यता आहे.

दौंड हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ असल्यामुळे तिथून त्यांना चांगली मते मिळू शकतात. बारामती पवारांचा बालेकिल्ला असला तरी कांचन यांचं माहेर असल्यामुळे काही प्रमाणात तरी तिथून त्यांना फायदा होऊ शकतो. दुसरीकडे इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात त्यावर तिथंल गणित अवलंबून आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे राहुल कुल यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्याचाही फायदा कुल यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर खडकवासला हा शहरी मतदारसंघ आहे. तिथे भाजपचा आमदार आहे. त्याचा फायदा कांचन कुल यांना होण्याची शक्यता आहे.

अर्थात गेल्या निवडणुकीत बसलेल्या धक्यामुळे सध्या सुप्रिया सुळे निकालानंतर जोरदारपणे कामाला लागल्या आहेत. त्यांनी मतदारसंघातील गाव न गाव पिंजून काढले आहे. गेल्यावेळ ज्या चुका झाल्या त्या दुसरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. भाजप शिवसेनेत युती होते की नाही ? पुढे कशा घडामोडी घतात  यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत.

COMMENTS