बीड – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेते भाजपाध्यक्ष अमित शाह यांना तडीपार नेता म्हणतात, मग पवार साहेबांना अनेक शेतकऱ्यांची जमीन लुबाडणारा नेता चालतो का, असा सवाल करत धस यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. सरकारी जमीन हडपल्याच्या आरोपाप्रकरणी मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टेंवरील गुन्ह्यांचा सूड म्हणून कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. त्यावरही धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रत्नाकर गुट्टेंवर अपहाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर पाच दिवसांपूर्वीच इडीने कारवाई केली. तब्बल दहा वर्षांपासून धनंजय मुंडेंनी पोलिसांवर दबाव आणत आजवर दाबलेलं प्रकरण माननीय ऊच्च न्यायालयामुळे ऊजेडात आल्याचं धस यांनी म्हटलं आहे. शिवाय सरकारी इनामी जमिनींचे खरेदीखत आणि एनए करणं गुन्हा आहे, कारस्थान नाही. हे गुन्हे धनंजय यांनी भाजपमध्ये असताना केलेले आहेत, ते षडयंत्रांचा कांगावा नेहमीचा करत असतात, असा टोलाही धस यांनी लगावला आहे.
COMMENTS