पंढरपूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत येण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडीकडून मनधरणी केली जात आहे. तर दुस-या बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोकसभेसाठी आपले उमेदवार घोषित केले जात आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवारांविरोधात राजू शेट्टी लोकसभा निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.
दरम्यान आज सोलापुरातील वेळापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माढा लोकसभा निवडणूक पक्षाकडून लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत आहे. या मतदारसंघात स्वाभिमानीचं चांगलं नेटवर्क आहे. मागच्या निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’कडून निवडणूक लढवली होती.
यामध्ये त्यांनी जवळपास साडेचार लाख मतं मिळवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत हातकणंगलेसोबत राजू शेट्टींनी माढ्यातूनही उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS