स्वाभिमानीने साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले

स्वाभिमानीने साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले

सांगली: साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील कार्यालय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. त्यामुळे राज्यभरात आता एकरकमी एफआरपीवरून साखर कारखानदार विरुध्द शेतकरी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफआरपी मिळावी असा आग्रह धरला होता. यासाठी सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनेही झाली. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केल्यानंतर हंगामाला सुरुवात झाली. मात्र, हंगाम सुरू होऊन अडीच-तीन महिने उलटले तरी, अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना इशारा दिला होता.

एफआरपी मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या घोगाव येथील कार्यालय पेटवून दिले. यात कार्यालयातील कागदपत्रे व फर्निचर जळाले आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या व कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांनी एकरकमी एफ आर पी द्यायचे कबूल केले होते, मात्र निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

COMMENTS