नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे माजी नेते तारिक अन्वर यांनी अखेर घरवापसी केली असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे महासचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज दिल्लीतील मुख्यालयात जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल डील प्रकरणावरुन पाठराखण केल्यानंतर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.
Delhi: Former NCP leader Tariq Anwar joined Congress in presence of party president Rahul Gandhi pic.twitter.com/hRiY1pzTji
— ANI (@ANI) October 27, 2018
दरम्यान अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच असून राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी मंत्रीमंडळात काम केले आहे. या काळात त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, १९९९मध्ये सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान होण्याला विरोध करीत शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून ते बाहेर पडले होते. परदेशी व्यक्तीने भारताच्या पंतप्रधानपदावर बसू नये अशी शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या काँग्रेसवासीयांची भुमिका होती.
आपल्या या भुमिकेवर ठाम राहत १९९९मध्ये शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. परंतु काही दिवसापूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
COMMENTS