नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तारिक अन्वर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण का दिलं नाही. तसेच वक्तव्याचा विपर्यास केला असं वाटत असतं तर शरद पवारांनी तेव्हाच स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर मी २४ तास वाट पाहिली, कारण पवार साहेब स्पष्टीकरण देतील, असं वाटलं होतं. पण त्यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही. त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचं स्पष्टीकर तारिक अन्वर यांनी दिलं आहे.
दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निष्कर्ष काढल्यास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याचे दिसून येते. राफेल विमान व्यवहारप्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. सर्व बाजूंनी पंतप्रधानांवर राफेल विमान व्यवहारप्रकरणी आरोप होत असताना पवारांनी याप्रकरणी पंतप्रधानांवर संशय नाही असे म्हटलं आहे.
तसेच या प्रकरणी जो रोष आहे तो निरर्थक असल्याचं वाटतं, असं म्हणत तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सर्व विरोधक राफेलप्रकरणी एकजूट झाले आहेत, सर्वांना वाटतं की या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. पण पवारांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाचं मोठं नुकसान झालं असल्याचंही अन्वर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS