मुंबई – सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवल्यामुळे मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारोंचा जमाव मोठ्या संख्येने जमला आहे. हजारो लोकांनी जमून गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी केली.आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये काम करणारे हे कामगार असून ते यूपी, बिहारचे रहिवासी आहेत. पोलिसांनी सध्या जमाव पांगवला असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
दरम्यान लॉकडाऊनमुळे प्रचंड गैरसोय आणि हालअपेष्टा होत असल्याची संबंधित कामगारांची तक्रार आहे. हे टाळण्यासाठीच ते त्यांच्या मूळगावी जाण्याचा हट्ट करत आहेत. त्यासाठीच ते बस डेपो परिसरात जमा झाले. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आहे.
या परिस्थितीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. स्थलांतरित कामगारांना अन्न-पाणी किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परतायचं आहे. कामगारांची घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचाच हा परिणाम असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS