नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोलकर, पानसरे करु अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’ हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती आहे. या धमकीच्या पत्राची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसकडे केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आम्हाला मनुस्मृती नकोय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवं असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. तसेच त्यांनी वेळोवेळी मनुस्मृतीचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे त्यांना ही धमकी दिली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS