पुणे – भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या मिलींद एकबोटेंच्या परिवाराला धमकीची पत्र पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणी एकबोटेच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तींनी एकबोटेंच्या निवासस्थानी ही पत्र पाटवली असून, या पत्रात एकबोटेंना अटक केलेल्या बातम्यांची कात्रण आणि त्याखाली “संपूर्ण एकबोटे परिवाराला तोफेच्या तोंडी द्या आणि एन्काऊंटर करा”, अशा आशयाचा संदेश लिहीला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे एकबोटे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. एकबोटेंवर याआधीही न्यायालय परिसरात हल्ला करण्यात आला होता. संजय वाघमारे नामक इसमाने एकबोटेंवर शाई फेकत त्यांना इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे यात एकबोटेंना कोणतीही इजा झाली नव्हती. त्यानंतर हे धमकीचं पत्र आल्यामुळे एकबोटे कुंटंब दहशतीखाली आहे. सध्या मिलींद एकबोटे न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या दिवशी एकबोटे आपल्या राहत्या घरी असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.
COMMENTS