लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा आणखी धक्का, ‘या’ पक्षातील तीन आमदारांसह 60 नगरसेवक भाजपात !

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा आणखी धक्का, ‘या’ पक्षातील तीन आमदारांसह 60 नगरसेवक भाजपात !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपानं विरोधकांना आणखी एक धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील दोन आणि सीपीआई (एम)मधील एका आमदारानं आज भाजपात प्रवेश केला आहे.बीजापुरचे आमदार सुभ्रांशु रॉय, नवापाराचे आमदार सुनील सिंह आणि बैरकपुरचे आमदार शीलभद्रा दत्ता यांनी आज भाजपात प्रवेश केला. तसेच या आमदारांसोबत पश्चिम बंगालमधील 60 नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे विरोधकांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान बंगालमध्ये लोकसभेला भाजपने पहिल्यांदाच 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे.2014 च्या निवडणुकीत भाजपने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या, तर यावेळी मोठी उडी घेत 18 जागांवर विजय मिळवला. टीएमसीचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्यादा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात केला होता. विशेष म्हणजे बंगालमधील भाजप आमदारानेही हाच दावा करत पुढच्या 90 दिवसांमध्ये ममतांचं सरकार पडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तीन आमदार भाजपमध्ये दाखल झाले असून आणखी आमदार भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान 295 सदस्यसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे 213 आमदार आहेत. सीपीआयएम 25, आरएसपी 03, एआयएफबी 02, सीपीआय 01, भाजप 06 आणि इतर 02 असं संख्याबळ आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सध्या तरी कोणताही धोका दिसत नाही. पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, त्यानंतर भाजप आणि टीएमसी यांच्यात जुंपली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS