सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. परंतु उद्घाटन कार्यक्रमाअगोदर या विमानतळाच्या नामकरामुळे कोकणात शिवसेना विरुध्द राणे हा पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. याच विषयावरून आमदार वैभव नाईक आणि नितेश राणे या जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये ट्वीटर वॉर सुरू झाले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. ‘नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!!’, असे ट्वीट नितेश यांनी केले होते.
सन्माननीय नारायण राणे साहेब हे मा. बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हे खा. राणे साहेबांचा Dream Project आहे.. म्हणून या विमानतळाला "स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ" हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 20, 2020
त्यास शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी ट्वीट करत गद्दार राणेंना बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेण्याचा अधिकार नाही, असे सांगताना विमानतळाच्या नामकरणाची चिंता राणेंनी करू नये, त्यासाठी शिवसेना पक्ष सक्षम आहे, असे वैभव नाईक यांनी ठणकावले. राणे यांची राजकीय अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे म्हणून केवळ श्रेय घ्यायला राणे पुढे सरसावले आहेत. मात्र, सिंधुदुर्गवासीय राणेंना ओळखून आहेत. राणे शिवसेना संपवायला निघाले होते पण, शिवसैनिकांनी त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले आणि पुन्हा जिल्ह्यात शिवसेना फोफावली, असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.
मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग दौऱयावर आले त्याचवेळी चिपीविमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी खा.विनायक राऊत यांनी केलेली आहे. त्यामुळे आ.नितेश राणेंनी नामकरणाची चिंता करूनये.ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही
— Vaibhav Naik (@VaibhavNaikMLA) December 21, 2020
दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र नितेश राणे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे व यापूर्वी अनेक शिवसैनिकांनी ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे. या विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणीही झाली असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
COMMENTS