मुंबई – विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले. या पराभवानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटलांना गावरान भाषेत टोला लगावला.
विधान परिषदेच्या निकालात धुळे वगळता सर्व जागांवर भाजपला पराभव सहन करावा लागल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, “या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळं चित्र निर्माण होत नाही, असे असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला.
या निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला. पुणे पदवीधर, मराठावाडा पदवीधर आणि अप्रत्यक्षरित्या अमरावती शिक्षक मतदार संघात त्यांना विजय मिळवता आला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचं साफ दिसतंय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
त्यास उत्तर देत असताना अजित पवार म्हणाले, “हे बघा आम्ही एकटं यायाचं की आघाडी करुन यायचं ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. यांनी कोणी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही,” असा टोला लगावला. पुढे बोलताना खास गावरान भाषेत त्यांनी, “हे बघा एक नक्की आहे. म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांच त्यांना लखलाभ”, अशी टिका केली.
COMMENTS