मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील कामांबाबत उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याची माहिती आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांची मतदारसंघातील काही कामांबाबत भेट घेतली असल्याची माहिती आहे. तसेच त्यानंतर उदयनराजे यांनी गिरीश महाजन यांचीही भेट घेतली आहे.
दरम्यान मतदारसंघातील कामांबाबत उदयनराजे भोसले यांनी या भेटी घेतल्या असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटींमागे राजकीय गणितं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्याबाबत राष्टावादीतून विरोध होत आहे. रविवारी राष्टावादी काँग्रेसच्या बैठकीत हा विरोध समोर आला. त्यानंतर उदयनराजे यांना रामदास आठवले यांच्या रिपाई आणि नारायण राणे यांच्या स्वाभीमानी पक्षाने आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
याशिवाय भाजपाचे सातारा जिल्ह्यातील नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनीही उदयनराजे यांना भाजपात येण्याचं निमंत्रण दिले आहे. उदयनराजे भाजपात आले तर त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी ऑफरच येळगावकर यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांची मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्याबरोबरची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे उदयनराजे यांनी भाजपात येऊन 1999 साली भाजपाच्या तिकीटावर सातारा येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती. 1999 च्या युती सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. यामुळे उदयनराजे आणि मुंडे यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळेच पंकजा मुंडे यांची भेटही महत्त्वाची मानली जात आहे.
COMMENTS