मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आज दुपारी 1 वाजता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मतदारसंघातील कामांबाबत ही भेट असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि उदयनराजे यांच्यात सध्या सातारच्या उमेदवारीवरुन जोरदार वाद सुरू आहे.
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी उदयनराजे यांना लोकसभेचं तिकीट देऊ नये अशी मागणी केली होती. इतर कोणालाही द्या मात्र उदयनराजे यांना नको अशी भूमिका सर्वांनी घेतली होती. त्यामुळे उदयनराजेंना राष्ट्रवादीचं लोकसभेचं तिकीट मिळणार का याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीनंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासारखे आपलेही इतर पक्षात मित्र असल्याचं सूचक विधान केलं होतं. तसंच साता-यातील भाजप नेते आणि माजी आमादार दिलीप येळगावकर यांनी उदयनराजे यांना पक्षात येण्याचं आवाहन केलं होतं. मतदारसंघातील कामांसाठी ही भेट आहे की त्याचं निमित्त करुन राष्ट्रवादीवर दबाबतंत्र आहे की अन्य काय आहे ? याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS