शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महापौर निवासस्थानी गेले. तिथे बाळासाहेब ठाकरे यांचे नियोजित स्मारक होणार आहे. महापौर निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांनी बंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चा केली.
दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याही माहिती मिळाली नाही. मात्र दोन्ही पक्षात निर्माण झालेल्या अत्यंत तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्व आलंय. अलिकडेच शिवेसनेचे आमदार फोडण्यचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवेसना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. थेट चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही आरोप जाधव यांनी केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षात कमलीचा अविश्वास निर्माण झाला होता. त्यावर कदाचित चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
दोन्ही पक्षातील ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भाजपच्या विरोधकांसोबतची उठबस वाढलेली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. तसंच उद्धव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यावरही बैठकीत काही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
तसंच येत्या 7 डिसेंबरला विधान परिषदेची निवडणूक आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिकामी झाली आहे. तिथे राणे नसतील तर उमेदवार कोण असावा याबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. तसंच राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
COMMENTS