मुंबई – बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेखचा सत्कार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती आहे. बाला रफिकने यावर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले आहे.
११-३ अशा गुणाने बाला रफिक शेखने अभिजितला धूळ चारली आहे. बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते. बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
दरम्यान बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला असल्याचं पहावयास मिळाले. राज्यभरातून बाला रफिकचे कौतुक केलं जात असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याचा सत्कार करणार आहेत. उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर असून तिथेच बालाचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS