मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागील सरकारने भीमा कोरगाव प्रकरणाबाबत जे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी झाली आहे की नाही हे तपासलं जात आहे. त्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.भीमा कोरेगाव प्रकरणात ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नाहीत त्या सर्वांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश गेल्या सरकारने दिले आहेत. त्या आदेशांची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्याचे आदेश दिले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान विकास कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाही. विकास कामांची माहिती मागवली जात असून त्यांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बुलेट ट्रेनबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जे इतर विकास कामं सुरु आहेत त्यांना मी स्थगितीचे आदेश दिलेले नाही. केवळ आरे कारशेडलाच स्थगिती दिली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS