उध्दव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, 288 विधानसभा क्षेत्रांचा घेणार आढावा!

उध्दव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, 288 विधानसभा क्षेत्रांचा घेणार आढावा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील 288 विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख आणि उपसंपर्कप्रमुख यांची तातडीने बैठक बोलावली आहे. उद्या शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वाटाघाटीबद्दल भाष्य केलं. ‘आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू. आता सगळं समसमान पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.य होते.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केला. आम्ही सर्व ठरवलं आहे. ‘कुणाला काय चर्चा करायची ते करू द्या. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय सांगू,’ असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच खुलासा केला.

त्यानंतर आज भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.’देवेंद्र फडणवीस यांना सर्वांचा पाठिंबा आहे आणि भविष्यातही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,’ असा दावा भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला आहे. भाजपच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या ‘समसमान’च्या भूमिकेला चांगलाच धक्का बसला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे याबाबतही उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS