मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे सुरु आहे. या मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशेष कायदा करुन राम मंदिर बांधण्याची मागणी केली आहे. राम मंदिराबाबत कोर्टाने चांगला न्याय दिला तर आनंद आहे, नाहीतर विशेष कायदा करा आणि राम मंदिर बांधा राम मंदिरासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आम्ही वचने पाळली नाही, तर ते रामालाही पटणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे..
तसेच देशावर प्रेम करणारे मुसलमानही आहेत, ते सोबत आले तर त्यांनाही न्याय हक्क मिळवून देऊ आता धनगराच्या काठीला तलवारीची धार आली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शरद पवार, चंद्राबाबू, मुलायम, मायावती यांची पंतप्रधान पदासाठी भांडणं म्हणून मोदींना पाठिंबा दिला असल्याही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच मी माझी ताकद काँग्रेसमागे कधीही उभी करणार नाही, महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युती स्वीकारली, उत्तर प्रदेशात सपा-बसपाची युती नाकारली. कारण ते सत्तेसाठी एकत्र आले होते. आम्ही युती हिंदुत्वासाठी केली. जो पर्यंत आम्ही काँग्रेसचे टार्गेट आहोत, तोपर्यंत तेही आमचे टार्गेट राहणार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनो आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लावला आहे.
तसेच अजित पवारांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात असं पाणी पाहिलं होतं. अजित पवारांच्या डोळ्यात आज पाणी येतंय, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, तेव्हा तुम्ही कुठलं पाणी दाखवलं होतं असही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS