मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उद्ध ठाकरे यांची मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत देशातील विविध राजकीय मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. सामानामध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीतील काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे खालीलप्रमाणे….
> उद्धवजी, बाहेर राजकीय वादळ घोंघावतंय पण तुम्ही इतके ‘Relax’ कसे?
मुलाखतीची सुरुवात करताना आपण माझं बरंच कौतुक केलंत, त्याबद्दल धन्यवाद! कारण हल्ली कौतुकाचे शब्द कानावर कमीच पडतात. तुम्ही वादळ म्हणालात. वादळ म्हटलं की गडगडाट, कडकडाट, विजांचा लखलखाट हे सगळं आलंच. नेमकं लोकसभेत तेच चाललंय. अविश्वास ठरावावरून जे काही सुरू आहे त्याबद्दल ‘सामना’च्या अग्रलेखात अत्यंत परखडपणे शिवसेनेची भूमिका मांडली आहे. मी शांत कसा असतो, हा तुमचा प्रश्न आहे…
> बाहेर नुसता गदारोळ चाललाय… पण तुम्ही शांत…
याचं कारण, माझ्या मनात कधीच पाप नसतं. मी जे काही बोलतो ते तळमळीने बोलतो. कुणाचंही चांगलं व्हावं याच्यासाठीच बोलतो. कुणाचं वाईट व्हावं यासाठी मी कधी बोललो नाही… बोलणारही नाही… आणि कुणाचं वाईट व्हावं असा कधीही प्रयत्न केला नाही…कदापि करणार नाही… ती शिकवण किंवा तो संस्कार माझ्यावर नाही. म्हणूनच ज्या वेळी सरकारविरोधात शिवसेना एखादी भूमिका घेते असे सर्वांना वाटते… मी अविश्वास ठरावाबाबतही हेच सांगतोय की, तिकडे लोकसभेत रणकंदन सुरू असताना मी शांतपणे आपल्याशी बोलतोय याचं कारण एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की, शिवसेना गेली चार वर्षे विविध विषयांवर जी भूमिका मांडत आली, तीच भूमिका आता इतरांना घ्यावी लागतेय.
> हा ठराव तुमच्या मित्रपक्षाविरुद्ध आहे…
– असेल. शिवसेना कुणाची मित्र आहे का? नक्कीच आहे. शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे. कोणत्याही एका पक्षाचा मित्र नाही… कधीच नाही…म्हणून वेळोवेळी एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही किंवा पटणार नाही तेव्हा आम्ही बोलतोय तसं बोलतो आणि बोलणारच… त्या सगळय़ाचा परिपाक पहा. गेल्या चार वर्षांत शिवसेनेने ज्या भूमिका मांडल्या त्या आपल्याला किती लागू पडताहेत ते पाहून प्रत्येक जण त्या तिथे मांडतोय. मग चंद्राबाबूंचा पक्ष आंध्रबद्दलचं मांडेल, आणखी कोणता पक्ष त्यांच्याबद्दलचं मांडेल. पण हे सगळं आम्ही सुरुवातीलाच मांडलंय. आम्ही सरकारच्या एखाद्या भूमिकेला वा धोरणाला विरोध केला तो देशाच्या, जनतेच्या हितासाठीच.
> सरकारमध्ये राहून तुम्हाला सातत्याने विरोध करावासा का वाटतो? जे काम विरोधी पक्षाने करायला हवं ते आपण का करता?
– विरोधी पक्ष काय करतोय ते लोकांनी पाहिलंय. शिवसेना केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सामील आहे… हो, नक्कीच आहे. आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत. जे काही केलं ते उघडपणे. साथ दिली तीसुद्धा उघड दिली आणि विरोध केला तोसुद्धा उघडपणेच.
> पण हे तुमचं काम खरंच आहे काय?
– का नसावं? सरकारवर अंकुश ठेवण्याचेच काम करतेय शिवसेना. आमच्याकडे मंत्रीपदे आहेत याचं कारण असं आहे की, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती. देशात एकूणच जो काही कारभार चालला होता (अर्थात आजही काही वेगळा आहे असं मला वाटत नाही…) त्या वेळेला कुणीतरी एक त्याच्यात बदल करेल अशी देशातील जनतेप्रमाणे आम्हालाही आशा होती. काही चांगल्या गोष्टी या सरकारच्या काळात झाल्या असतील तर त्याचं कौतुक करणं हाही आमचा स्वभाव आहे. चांगल्या गोष्टी अजिबातच झाल्या नाहीत असे नाही. काही गोष्टी गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाहीत, देशाच्या हिताच्या नाहीत असे आम्हाला वाटते, तिथे सत्तेत असलो तरी आम्ही विरोध करणारच. याचं कारण मी मघाशीच सांगितलंय की, आम्ही मित्र आहोत ते आपल्या देशातील जनतेचे.
> सरकारवर अविश्वासदर्शक ठराव आला… आपण निर्णय घेतलात की, त्या चर्चेमध्ये किंवा त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही. सत्तेमध्ये असूनसुद्धा सरकारला मतदान करणार नाही. हे थोडं गोंधळाचं वाटत नाही का?
– अजिबात नाही. सरकारला मतदान करायचंच असतं तर इतके दिवस आम्ही सरकारच्या निर्णयावर हल्ला का चढवला असता? आज जे सगळे मिळून बोलताहेत तीच भूमिका शिवसेनेने आधीच मांडली होती. मग नोटाबंदी असेल, जीएसटी असेल, भूसंपादन कायद्याबद्दल असेल, विषय कोणताही घ्या, आज सगळे जण एकत्र बोलताहेत. पण त्या वेळेला याविरोधात बोलण्याचे धाडस फक्त शिवसेनेनेच दाखवलंय. म्हणूनच मी म्हणतो की, सत्तेमध्ये आम्ही आहोत, पण विश्वासदर्शक-अविश्वासदर्शक हा जो काही प्रकार आहे… नेमका कुणी कोणावर विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? आम्ही विरोधी पक्षात जाऊन सरकारविरोधात मतदान करायचे का? विरोधी पक्षाने तरी असं काय केलं आहे? जेव्हा शिवसेना जनतेच्या विषयांवर आवाज उठवत होती तेव्हा हे पक्ष कुठे होते? गोरगरीबांची विल्हेवाट लावणारी नोटाबंदी केली गेली. मला माहितेय की, दुसऱया की तिसऱया दिवशी एकटय़ा शिवसेनेने देशभरात आवाज उठवला होता. त्या वेळी वातावरण असं होतं की, याविरोधात जो बोलेल तो देशद्रोही. मग शिवसेनेने तेव्हा उचललेले मुद्दे आज सगळे जण घोकताहेत आणि बोलताहेत.
शिवसेना सदेह आणि सदैव शेतकऱ्यांसोबत राहील!
माझी मैत्रीची व्याख्या वेगळी आहे. मित्र एखादी गोष्ट चुकत असेल तर ती परखडपणे सांगणारा तो खरा मित्र. वाहवा करणारे, भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही. देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतरही चुकत असेल तर परखडपणे सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार.
> मग त्या अर्थाने सगळय़ात पहिले देशद्रोही तुम्ही ठरले आहात आणि त्यानंतर हळूहळू या देशद्रोही वक्तव्याची रांग लागली…
– तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा. पण मी एक मुद्दा मांडतो. प्रेरणा हा प्रकार नक्कीच असतो. क्रांतिकारक हे आपल्या देशासाठी क्रांतिकारकच होते आणि आहेत. ते वंदनीय आहेत. पण इंग्रजांसाठी ते काय होते? तसंच जर का माझ्याविषयी कुणाला काही वाटलंच तर काय करणार! मी माझ्या देशासाठी काही चांगले करताना कुणाला काय वाटेल त्याची मला पर्वा नाही. देशाच्या जनतेला माझ्याबद्दल काय वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं.
> तुम्ही ‘विश्वास’ या शब्दाची व्याख्या कशी करता? राजकारणात दिलेला शब्द आणि विश्वास याला किती महत्त्व तुम्ही देता?
– फार महत्त्व आहे त्याला, परंतु तशी विश्वासाला जागणारी पिढी ही आता आहे का? संस्कार हा शब्द मी वापरला. माझ्यावर माँ आणि साहेबांचे संस्कार आहेत. आजोबांच्याही अनुभवाच्या गोष्टी आहेत. स्वतः आजोबांनी मला सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या आहेत…पण तो जो काळ होता तो वेगळा होता. एखादा शब्द दिला की दिला. मग मागे फिरणे नाही. तोंडदेखलं तुम्हाला बरं वाटावं म्हणून एखादी गोष्ट बोलणं आणि तुमची पाठ वळल्यावर पाठीत वार करणं ही जर का नीती असेल तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? आणि अविश्वास तरी कुणावर दाखवायचा?
> तुम्ही हे अत्यंत वेदनेनं सांगताय असं मला वाटतं. कारण पाठीत झालेला वार घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आहात असं सारखं वाटतंय… तशी तुमची भावना आहे का?
– पाठीत वार आमच्या नाही, तर जनतेच्या आहे. आज सरकारविरोधात एकूणच जो काही अविश्वास ठराव आणला गेलेला आहे तो कोणाकडून आणला आहे. सर्वसाधारणपणे विरोधी पक्षाकडून आणला जातो, पण सरकारविरोधात आणलेला ठराव हा तेलगू देसम पार्टीने आणलेला आहे.
COMMENTS