मुंबई – जितेंद्र आव्हाड यांना पूर्वी टीव्हीवर बघायचो. तेव्हा ते काय बोलतायत, कशासाठी बोलतायत हे कळत नसायचं. आता जवळ आल्यावर ते कसे आहेत हे कळतंय असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज म्हाडाच्या घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात ही सोडत काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब हे उपस्थित होते.
दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या यादीत एकूण 3894 घरांच्या सोडतीची घोषणा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांकडून या हक्काच्या घरांपैकी एकही घर विकणार नाही, असं वचन घेतलं.मी गिरणी कामगारांमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. हे तुमचं ऋण आहे. त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. मी आज येथे तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच असेल असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसेच तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी यात बलिदान दिलं आहे. त्यामुळे आज तुमच्यासाठी काही केलं नाही, तर इतिहासात आमची नतद्रष्ट म्हणून नोंद होईल. म्हणूनच हे सगळं करायचं आहे. ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. मला वचन द्या, यातील एकही घर विकायचं नाही. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
COMMENTS