उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा, भाजपसोबतच्या युतीबाबत मांडणार भूमिका ?

उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा, भाजपसोबतच्या युतीबाबत मांडणार भूमिका ?

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काल ‘मातोश्री’वर येऊन केलेल्या मनधरणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे आज लक्ष असेल. उद्धव ठाकरे यांची आज दुपारी तलासरी येथे जाहीर सभा होतेय. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल, ठाकरे त्यांचे आभार मानण्यासाठी येत आहेत. यावेळी ते वनगा कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत.

दरम्यान जाहीर सभेत उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपबरोबर युतीसंदर्भात काही भाष्य करतात का ? याबाबत उत्सुकता लागली असून अमित शाह यांच्याबरोबर ठाकरे यांची काल सुमारे दोन तास चर्चा झाली होती. या चर्चेनंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी शिवसेनेशी पुन्हा युती होण्याबाबत आशावादी आहेत. परंतु यापूर्वीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत शिवसेना ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS