मुंबई – अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडिलधाऱ्याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
COMMENTS