नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विरोधकांना सणसणीत उत्तर दिलं आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार ‘तीनचाकी’ आहे. ती धावून धावून किती धावणार, असा चिमटा फडणवीस यांनी काढला होता. त्यावर बोलताना उद्धव यांनी होय आमचं सरकार ‘तीन चाकी’ आहे. कारण, गोरगरिबांना तीन चाकी रिक्षाच परवडते. बुलेट ट्रेन परवडत नाही. परवडणार नाही. असं म्हटलं आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उद्धव ठाकरे विधानसभेत बोलत होते.
दरम्यान ट्रेड मिलवर चालणाऱ्यास वाटतं की आपण खूप चाललो. पण तो असतो तिथंच. गेले काही दिवस काहींना असंच वाटत होतं. पण आमचं तसं होणार नाही. कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे आमच्या सरकारचं धोरण असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपचे चांगलेच कान उपटले. सावरकर म्हणजे काय? हे दुसऱ्यांना समजून सांगण्याआधी स्वतः समजून घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता? अशा शब्दात गोवंश हत्याबंदीच्या कायद्यावरुन भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू यांचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
बाहेरील देशातील हिंदूच्या येण्याबद्दल आमची ना नाही, पण त्यांची काळजी घेणार कोण? हा माझा प्रश्न आहे. फडणवीसांनी जे सावरकरांचं वक्तव्य आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. मग बेळगावचे बांधव हिंदू नाहीत का? ते मराठी आहेत. त्यांच्यावर भाषिक अत्याचार होतात. मग आपण त्यांच्यासाठी केंद्रात जाऊन मदत मागू शकत नाही का? सावरकरांना मानत असू, तर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा नाही का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला.
COMMENTS