मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ मतदारसंघातून होणार आमदार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘या’ मतदारसंघातून होणार आमदार?

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला आहे. परंतु उद्धव ठाकरे हे अद्याप विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सभासद व्हावं लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर आमदार होणार आहेत.उद्धव ठाकरे हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता दुसऱ्या आमदाराला राजीनामा द्यायला लावून पुन्हा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे हे सोईचं होणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर आमदार होणार आहेत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातुन शिवसेना आमदार तानाजी सावंत हे नेतृत्त्व करत आहेत. मात्र तानाजी सावंत यांनी उस्मानाबादेतील परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे आता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या जागेवरुन विधानपरिषदेवर जाण्याची चिन्हं आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS