अहमदनगर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं कट्टर विरोधकासोबत मनोमिलन झालं आहे. विखे यांचं राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासोबत मनोमिलन झालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा पेच सोडवला आहे. विखे कुटुंबासोबत मुरकुटे यांचा विरोध जुना आहे. पण उद्धव ठाकरे यांनी विखे आणि मुरकुटेंचा हातात हात देऊन मनोमिलन घडवून आणलं आहे. यावेळी व्यासपीठावर एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसऱ्या बाजूला भानुदास मुरकुटे बसले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विखे पाटलांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान मुरकुटे यांनी आपल्या भाषणादरम्यान विखे आणि माझी मैत्री कधी-कधी तुटते, असा चिमटाही काढला. राधाकृष्ण विखे पाटलांनी आता गडबड केली तर खासदार सुजय विखे पाहून घेतील, कारण त्यांचं-आमचं ठरलंय असंही यावेळी मुरकुटे यांनी म्हटलं आहे. भानुदास मुरकुटे हे सध्या कोणत्याही पक्षात नसून स्थानिक आघाडीच्या माध्यमातून ते राजकारणात आहेत. पण त्यांनी 2004 ला दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांविरोधात कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात मुरकुटेंचा पराभव झाला होता. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते एकत्र आले आहेत.
COMMENTS