शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, उद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा ?

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, उद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा ?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे. याबाबत उद्धव ठाकरे स्वतः आमदारांशी चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि आमदार असा हा संवाद सुरु झाला असून सत्तेत रहायचं की नाही यावरच सध्या चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील आमदारांशी संवाद साधला आहे. या संवादामध्ये उद्धव ठाकरे एक प्रश्न किंवा मत आमदारांना हमखासपणे विचारत आहेत. ते म्हणजे सतेतून बाहेर पडावं की नाही ? आणि पडावं तर का आणि कधी पडावं ? तसेच सत्तेत राहायचं तर का ? याबाबत सध्या विचार सुरु आहे. तसेच मतदार संघातील प्रश्न आणि राजकीय समीकरणं उद्धव ठाकरे आमदारांकडून समजून घेत असल्याची माहिती देखील आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असा सवाल आता राजकीय वर्तुळात फिरत आहे.

COMMENTS