“मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाच वर्ष शिकण्यातच जातील !”

“मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पाच वर्ष शिकण्यातच जातील !”

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अनुभवहिन मुख्यमंत्री असून मुख्यमंत्र्यांने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने ते दिसत नाही त्यामुळे राज्याची परिस्थिती बिघडली असून त्यांची पाच वर्षे शिकण्यातच जातील, असा टोला भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलचे आमदार हरिराम चेरो यांनी लगावला आहे.आमदार चेरो हे सोनभद्रमधील दुद्धी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. चेरो यांनी योगी आदित्यनाथांवर अवैध खाणप्रकरणात अनियमिततेविषयीही आरोप करत त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे योगी आदित्यनात यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे आज लखनऊच्या दौऱ्यावर आहेत. त्याचदरम्यान चेरो यांनी हे वक्तव्य केलं असल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. अधिकारी वर्ग योगींची दिशाभूल करत आहेत. तक्रारीवर कारवाई होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांमध्ये अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे ते काम करू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कामात वेग घेतला पाहिजे असा सल्लाही चेरो यांनी योगींना दिला आहे. तसेच माझा मतदारसंघ खूप मागास आहे. हे वाळू उपसा करण्याचे क्षेत्र आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलला आहे. खुलेआम चार-चार पोकलेनने उपसा केला जात असून याप्रकरणी तक्रारी केली तरी पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आमदार चेरो यांनी केला आहे.

 

COMMENTS